२७ डिसेंबर रोजी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सोलापूर : संविधानाबद्दल जनजागृती करण्यासाठी, संविधानिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली संविधान गौरव परीक्षा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उत्साहात घेण्यात आली. शहरात लोकराजा अभ्यासिका आणि विश्वभूषण विद्यालय तसेच माढा तालुक्यातील मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव या केंद्रांवर ही परीक्षा झाली.

शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदविला.सुरुवातीला संविधान दररोजच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे, संविधान साक्षर झाल्यावर कोणते फायदे होतात आणि कोणते अनर्थ टळतात, हे दर्शविण्यासाठी गेल्या पाच वर्षापूर्वीपासून हा विचार यज्ञ सुरू केला असल्याचे राज्य कर निरीक्षक, अभियंता, प्रथितयश लेखक बुद्धजय भालशंकर यांनी सांगितले.

ही परीक्षा ८वीते १२वी आणि १२वी पुढील अशा दोन गटांत घेण्यात आली होती. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण १५ हजार रुपयांची रोख शिष्यवृती, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते शनिवार, दि. २७डिसेंबर रोजी शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.परीक्षेच्या यशस्वितेसाठी संचालक आशुतोष तोंडसे, सागर लोंढे, रोहित लोंढे, मुक्ता आतकरे, विनोद वर, सत्यवान पाचकुडवे, ज्योती चव्हाण, भौरम्मा वाघमारे यांनी परिश्रम घेतले.







