पुणे ; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षा दि.२३ जानेवारी सुरू केल्या जाणार आहेत. यंदा इयत्ता दहावीसाठी 16 लाख 14 हजार 987 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून बारावीसाठी 15 लाख 32 हजार 862 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.यावर्षी तब्बल 80% परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्या जात आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त बोलत होते. यावेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, हारून आतार आदी उपस्थित होते.
मागील वर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविले जात असून सर्व जिल्ह्यांमध्ये त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील 80 टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही ताण-तणावाखाली न येता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, इयत्ता बारावीसाठी पुणे विभागातून 2 लाख 60 हजार 266 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 437 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. नागपूर विभागातून 1 लाख 60 हजार 622 विद्यार्थ्यांनी, छत्रपती संभाजीनगर येथून 1 लाख 91 हजार 490 विद्यार्थ्यांनी, मुंबईतून 3 लाख 52 हजार 712 विद्यार्थ्यांनी, कोल्हापूरमधून 1 लाख 16 हजार 611 विद्यार्थ्यांनी तर अमरावती विभागातून 1 लाख 56 हजार 957 विद्यार्थ्यांनी, नाशिक विभागातून एक लाख 73 हजार 649 विद्यार्थ्यांनी, लातूर विभागातून 95 हजार 542 विद्यार्थ्यांनी तर कोकण विभागातून 24 हजार 13 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
इयत्ता दहावीसाठी एकूण 16 लाख 14 हजार 997 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांची परीक्षा 511 परीक्षा केंद्रांवर घेतले जाणार आहे. त्यात पुणे विभागातून दोन लाख 78 हजार 86, नागपूर विभागातून एक लाख 53 हजार 937, छत्रपती संभाजीनगर मधून एक लाख 91 हजार 885, मुंबई विभागातून तीन लाख 49 हजार 612, कोल्हापूर विभागातून एक लाख 32 हजार 797, अमरावती विभागातून एक लाख 65 हजार 318, नाशिक विभागातून दोन लाख 6 हजार 528, लातूर विभागातून एक लाख 11 हजार 55, कोकण विभागातून 25 हजार 769 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.










