सोलापूर: भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “अंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला” या घोषणांच्या जयघोषात कार्यकर्त्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र राजेश कोठे यांनी भाजप परिवारातील कोट्यवधी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
४६ वर्षांचा गौरवशाली प्रवास: पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास, जनसंघ काळातील संघर्ष आणि अटलजी-अडवाणीजी यांच्या नेतृत्वापासून ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘सुवर्णकाळ’ यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, अंत्योदयाचा विचार घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.” सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील ठिकठिकाणी ध्वजारोहण आणि जनसंपर्क मोहिमेद्वारे हा दिवस साजरा करण्यात आला.



यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “राष्ट्रहित प्रथम” या ब्रीदवाक्यानुसार आगामी काळातही सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिली.











