मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप व शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव आता थेट मुंबईतही उफाळून आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणारे हे दोन्ही मित्रपक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर आमनेसामने आल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला, ज्यामुळे मतदानाच्या काही तास आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघडपणे समोर आला असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही उमेदवारांचे प्रचार फेरी सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच परिसरात एकत्र आले. सुरुवातीला वातावरण शांत होते, मात्र अचानक भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माईकवरून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा आता थेट मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिली गेल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
या घोषणाबाजीमुळे काही वेळातच प्रचाराचे वातावरण तणावपूर्ण बनले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात प्रत्युत्तरात्मक घोषणा देत नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षाकडूनच अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याने आम्हाला अपमानित केल्याची भावना निर्माण झाली, अशी प्रतिक्रिया अनेक शिंदे समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईतील निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटनेचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो.
या वादामागची पार्श्वभूमी पाहिली असता, भाजप–शिवसेना यांच्यातील जागावाटपातील गुंतागुंत पुन्हा समोर येते. वॉर्ड क्रमांक 173 हा अधिकृत जागावाटपानुसार शिंदे सेनेला सुटलेला होता. त्यानुसार शिंदे गटाने पूजा कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज वैध ठरला. त्यामुळे दोन्ही पक्षांना नाईलाजाने या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जावे लागले. सुरुवातीला ही लढत सौहार्दपूर्ण राहील, असे संकेत होते, मात्र प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर ‘दोस्तीत कुस्ती’चे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.










