महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आदेश
सोलापूर : महिन्यात दिलेले इष्टांक पूर्ण न झाल्याने महापालिकेतील ६४ वसुली लिपिकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड त्यांच्याकडून तातडीने वसूल करण्यात येणार आहे. महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त आशिष लोकरे यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत. सोलापूर महापालिका मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. याच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी महापालिकेच्या कर वसुलीतील सर्व पेठांमधील वसुली लिपिकांना दरमहा वसुलीचे इष्टांक देण्यात आले आहे. मात्र महापालिका मालमत्ता कर विभागासाठी वार्षिक उद्दिष्टपूर्ती थकबाकी वसूल करणे, थकबाकी न भरल्यास मिळकतींवर बोजा चढविणे अथवा मिळकती सील करणे अशा प्रकारची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. उद्दिष्टपूर्ती होण्याच्या दृष्टीने यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा बैठकीत आदेश दिलेले आहेत.
दरम्यान, माहे नोव्हेंबर मध्ये प्रत्येक वसुली लिपिकाने किमान २ लाख रुपयाची वसुली आणण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. दि. १ ते ११ नोव्हेंबर या कालावधीमध्ये केवळ १ कोटी ८७ लाख ५९ हजार ९९३ रुपये इतकीच वसुली झालेली आहे. वसुली संदर्भात वारंवार बजावून देखील वसुली इस्टांकानुसार वसूल न करता वसुली कमी प्रमाणात आणल्याचे निदर्शनास आले आहे. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करणे जबाबदारी व कर्तव्य पार न पडणे. असे प्रकार निदर्शनास आले आहे. यासाठी सर्वस्वी वसुली लिपिक हेच जबाबदार आहेत. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ चे नियम ३ (१) मधील तरतुदीचा भंग झाल्याने त्यास वसुली लिपिक यांना जबाबदार धरण्यात आले आहे. यानुसार महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील एकूण ६४ वसुली लिपिक- कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५६(२) (ड) च्या तरतुदीनुसार प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.







