सोलापूर : सोलापुरात ड्रग्ज तस्करीचे जाळे वाढत असल्याचे गेल्या महिनाभरात उघडकीस आलेल्या दोन घटनांवरून दिसून येते. मुंबईहून अमली पदार्थांची खरेदी करून शहरात त्याची सर्रास विक्री केली जात आहे. पुण्याहून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या अशाच एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी बसस्थानकात अटक केली. मोहमद अझहर हैदरसाहेब कुरेशी, (३७ वर्षे रा. मिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट कॅम्प, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळ ३२ ग्रॅम मॅफेड्रीन (एमडी) आढळून आले. बाजारपेठेत त्याची किमत सुमारे एक लाख रुपये आहे. त्याच्यावर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला. यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी कर्णिकनगरच्या चिल्ड्रन पार्कच्या बाजूला ड्रग्ज विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला अटक केली होती.
शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे वाढत आहे. केवळ तरुणच नव्हे तर तरुणीही आता या व्यसनाच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. ते रोखण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार व पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेकडे जबाबदारी सोपवली आहे. उपनिरीक्षक श्यामकांत जाधव, हवालदार बापू साठे हे मंगळवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पुण्याहून एक तस्कर ड्रग्ज घेऊन बसने येणार असल्याची खबर त्यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांना सूचना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक बसस्थानकात येऊन थांबले. पुण्याहून बस येताच संशयित वर्णनाच्या व्यक्तीला त्यांनी घेरले. पथकाने त्याची चौकशी करून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर सापडली.
गेल्या काही दिवसांत सोलापूर शहरात व ग्रामीण भागात ड्रग्ज तस्करीचा विळखा वाढत चालला आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांना टार्गेट करण्याचे तस्करांचे प्रयत्न आहेत. यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. मांजर, माऊ, व्हाईट, चावल अशा सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. यापूर्वी धाराशिव, पुणेमार्गे हस्तकांमार्फत अंमली पदार्थ शहरात आणले जायचे. आता थेट मुंबईहून खरेदी करुन त्याची सर्रास विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे गोळ्या व पावडर स्वरुपात त्याची विक्री केली जाते. पोलिसांच्या कारवाईत एक-दोन एजंट पकडले जातात, मात्र त्याचे म्होरके अजूनही हाती लागत नाहीत. एखादा आरोपी पकडला गेला तर म्होरके दुसऱ्याला तयार करुन रॅकेट सक्रिय ठेवतात.







