सोलापूर : बाळ अदलाबदलीप्रकरणी सखोल माहिती मिळावी यासाठी शासकीय रुग्णालयात तीनसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. विद्या तिराणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.सिव्हिलमध्ये प्रसूत झालेल्या बाळाची अदलाबदली झाल्याप्रकरणी नातेवाइकांकडून तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडूनही तपास सुरू आहे. यात संबंधित घटनेच्या दिवशीची सीसीटीव्ही तपासणी करून पुढील कार्यवाही करू असे पोलिसांचे मत आहे. पालकांकडून डीएनएसाठी सदर बझार पोलीस
ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
बाळ अदलाबदलीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी ‘बी’ ब्लॉकची पूर्णपणे झडती घेतली. यात त्यांनी शौचालयाचीही पाहाणी केली. हॉस्पिटलमध्ये असलेली अस्वच्छता, रुग्णांना दिली जाणारी सेवा चांगली असावी यासाठी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. शिवाय ज्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर कार्यवाही सुरू आहे. पण याचा तपास संथगतीने सुरू असून, यासाठी त्वरित पावले उचलावी, अशी मागणी नातेवाइकांकडून होत आहे.







