सोलापूर : महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांत डफरीनसह इतर रुग्णालयात प्रसूती संख्येत वाढ झाल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली. गेल्या चार महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयात ९४२ प्रसूती झाल्या आहेत. महापालिकेने उद्योजकांच्या सीएसआरच्या मदतीने कोट्यवधी रुपये खर्चुन शहरातील दोन रुग्णालये अद्ययावत केली आहे.
या अद्ययावत केलेल्या दवाखान्यांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता व अत्याधुनिक सुविधांवर महापालिकेने भर दिला आहे. त्यामध्ये सातत्य राखले आहे. डॉक्टर व नर्स आदी सेवकांच्या यंत्रणेचे नियोजन चांगले केले आहे. त्यामुळे महापालिकेची रुग्णसेवा, आरोग्यसेवा अधिक सक्षम व विश्वासार्ह बनल्याने नागरिकांचा कल पुन्हा महापालिकेच्या प्रसूतिगृहांकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे मनपाच्या प्रसूतिगृहांमधील रुग्णसंख्या व प्रसूतींची संख्या दोन्हींमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. डफरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह, दाराशा प्रसूतिगृह या दोन्ही प्रसूतिगृहांमध्ये नॉर्मल आणि सिझरियन प्रसूती केल्या जातात.
त्याचबरोबर भावनाऋषी, जिजामाता प्रसूतिगृह, चाकोते प्रसूतिगृह, रामवाडी प्रसूतिगृह यासह इतर प्रसूतिगृहामध्ये गर्भवती रुग्णांचो संख्या वाढली आहे. पूर्वी अत्याधुनिक सुविधा नसल्याने तांत्रिक अडचणीमुळे नाइलाजास्तव कठीण परिस्थिती निर्माण झाल्यास गर्भवती महिलांना सिव्हिलकडे पाठवावे लागते. आता महापालिकेच्या कोणत्याही प्रसूतिगृहात आल्यास डफरीन किंवा दाराशामध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते, त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे डॉ. राखी माने यांनी सांगितले.







