:246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे.
उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल
नगरपंचायतीत 1 सदस्य व 1 अध्यक्ष असतो. त्यामुळे त्यात मतदारांना दोन मते द्यावी लागतील. नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आयोगाने यासंबंधी एक पोर्टल तयार केले आहे. उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील. एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक 4 उमेदवारी अर्ज भरता येतील. संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल.
246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर..!
निवडणुकीचे वेळापत्रक
▶️नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
▶️अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
▶️छाननी – 18 नोव्हेंबर
▶️अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
▶️निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
▶️मतदान – 2 डिसेंबर
▶️निकाल – 3 डिसेंबर







