सोलापूर : विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत १५ दिवसांत शस्त्रानिशी हल्ले करून लाखोंचा ऐवज लुटून नेल्याचे दोन गुन्हे घडले. रात्रीच्या वेळी आयटी इंजिनिअरला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिस अॅक्शन मोडवर आले असून आता दररोज शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे. या नाकाबंदीवेळी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक पोलिसही असणार आहेत.
सोलापूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने विशेषतः विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सोलापूर शहरात फौजदार चावडी, एमआयडीसी, जेलरोड, सलगर वस्ती, एमआयडीसी, सदर बझार व जोडभावी अशी सात पोलिस ठाणी आहेत. सध्या दररोज रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कार्यवाही होते. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होती. पण, आता दररोज प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी, ही नाकाबंदी कधी व कोणत्यावेळी तसेच कोणत्या ठिकाणी करण्यात येणार असेल ती अचानाकपणे ठरविण्यात येणार आहे.
तसेच या नाकाबंदीवेळी वाहतूक पोलिस देखील त्याठिकाणी असतील, असेही या बैठकीत ठरले. शहराच्या मध्यवर्ती भागात चोरी, दरोड्याच्या घडू लागल्या आहेत. चोरी गुन्ह्याचे प्रमाण दरवर्षी एवढेच असले तरी त्याचे प्रमाण कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात रात्रगस्त वाढविली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांसह शहर पोलिस मुख्यालयातील २५ ते ३० अंमलदारांची मदत घेतली जाणार आहे. दिवाळीच्या काळात असाच प्रयोग पोलिस आयुक्तांनी केला होता, त्यामुळे सणात चोरी, दरोड्यासारख्या घटना घडल्या नाहीत. त्या पद्धतीने आता दररोज तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.










