शहरातील नागरिकांना दिलासा..
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 अन्वये अधिसूचित केलेल्या सेवांवरील अपिल ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना पारदर्शक, सुलभ व जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेकडून अधिसूचित केलेल्या सेवांचा निर्णय निर्धारित वेळेत न मिळाल्यास अथवा प्राप्त सेवेसंदर्भात तक्रार असल्यास संबंधित सेवांचे अपिल आता नागरिकांना ऑनलाईन करता येणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून सध्या एकूण 144 सेवा ऑनलाईन स्वरुपात दिल्या जात असून, या सर्व सेवांचा आढावा घेण्यासाठी ‘सेवा डॅशबोर्ड’ तयार करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर विभागनिहाय खालील माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या, निकाली काढलेल्या अर्जांची संख्या, तसेच कर्मचारीनिहाय प्रलंबित अर्जांची माहिती. डॅशबोर्डवरील ‘वापरकर्त्यासाठी सूचना’ या विभागात उपलब्ध माहितीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन दिलेले आहे.या नव्या डिजिटल सुविधेमुळे सोलापूर महानगरपालिका अधिक पारदर्शक, जवाबदार व जनसुलभ प्रशासनाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले

- सोलापूर महानगरपालिकेच्या होम पेजवरील ‘नागरिक’ या मेनूमधील ‘प्रथम सेवा अपिल’ व ‘द्वितीय सेवा अपिल’ या पर्यायांखाली सदर सुविधा उपलब्ध आहे.
- अपिल करताना नागरिकांनी संबंधित सेवेचे नाव निवडून, त्याबाबत ऑनलाईन अर्जाचा क्रमांक प्रविष्ट करावा.
- OTP द्वारे खात्रीकरणानंतर अपिलासंबंधी आवश्यक कागदपत्रांची एकच PDF फाइल अपलोड करावी.
- अपिल सादर झाल्यानंतर अर्ज क्रमांक SMS द्वारे नागरिकांना कळविण्यात येईल.
- अपिलाच्या सुनावणीची वेळ व निकालाची माहिती देखील SMS द्वारे पाठविली जाईल.
- सुनावणीचा निर्णय नागरिकांना वेबसाईटवरून थेट ऑनलाईन डाउनलोड करता येणार आहे.







