पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी आणि भाविक भक्तांनी श्रींच्या चरणी उदंड दान अर्पण केले आहे. या वर्षीच्या यात्रेत एकूण 5 कोटी 18 लाख 77 हजार 228 रुपये इतके उत्पन्न देवस्थान समितीच्या खात्यात जमा झाले आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते हुंडीपेट्यांतील रोख देणग्या, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास शुल्क अशा विविध माध्यमातून ही देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली.
22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री विठ्ठलाच्या चरणी विविध स्वरूपात देणग्या अर्पण केल्या. श्रींच्या चरणाजवळील अर्पणातून 48 लाख 8 हजार 289 रुपये, देणगी स्वरूपात 1 कोटी 27 लाख 91 हजार 520 रुपये, लाडू प्रसाद विक्रीतून 54 लाख 16 हजार 500 रुपये, तर भक्तनिवासातून 71 लाख 59 हजार 910 रुपये एवढे उत्पन्न मिळाले. याशिवाय 1 कोटी 77 लाख 15 हजार 227 रुपये हुंडीपेट्यांतून जमा झाले असून पूजा, अगरबत्ती, चंदन, फोटो, महावस्त्रे आणि मोबाईल लॉकर आदी माध्यमातूनही जवळपास 6 लाख 70 हजार रुपये उत्पन्न मिळाले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात 33 लाख 36 हजार 876 रुपये किंमतीची अर्पण वस्तू श्रींच्या खजिन्यात जमा झाली आहे.
या वर्षीच्या उत्पन्नात मागील कार्तिकी वारीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी 3 कोटी 57 लाख 47 हजार 322 रुपये इतके उत्पन्न जमा झाले होते, तर यंदा 1 कोटी 61 लाख 29 हजार 906 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. यात्रेचा कालावधी तुलनेने कमी असूनही भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मंदिर समितीचे उत्पन्न विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. श्रींच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंमुळेही यंदाच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.







