सोलापूर : गेल्या ६ दिवसांपासून शहराच्या तापमानात दररोज ६ अंशाची घट सुरू आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला. मंगळवारी (११ नोव्हेंबर) शहरात १६.४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. या मोसमातील निचांकी (१५.४) तापमानाची नोंद सोमवारी झाली होती. यावर्षी झालेला अतिरिक्त पाऊस आणि हवामानात झालेल्या बदलामुळे यावर्षीच्या मोसमामध्ये शहराचे तापमान ८ अंश सेल्सियसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळी १० पर्यंत वातावरणात गारवा राहू लागला आहे. पुढील दोन दिवस आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मंगळवारी व बुधवारी सोलापूर शहर व परिसरात १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. १५ नोव्हेंबरपासून दर चार दिवसांनी तापमानात घसरण होईल. १४ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत ते खाली येण्याचा अंदाज आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंतही पारा येऊ शकेल. यावर्षी १५ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका मागील वर्षर्षीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अदांज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
थंडीचा जोर वाढत असल्याने स्वेटर, मफलर यासह गरम कपड्यांचा वापर वाढू लागला आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरीही थंडी जाणवत नव्हती. शनिवारपासून सोलापूरच्या वातावरणात बदल झाल्याने आज दिवसभर बाजारात गरम कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली होती. गरम कपड्यांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. थंडीचे हे वातावरण पुढील काही दिवस असेच कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला या सारखे विकारही अनेकांना उद्भवू लागले आहेत.







