पुणे : पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीला मोठा धक्का बसला आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात एकूण 42 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार असून, निश्चित वेळेत ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेडिया कंपनीकडून करण्यात आलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या अनियमितता आढळल्या होत्या. या संदर्भात महसूल विभागाने तपास सुरू केला होता. त्यात कंपनीने खरेदीखत आणि त्यानंतरचा रद्द करारनामा नोंदविताना स्टॅम्प ड्युटीची संपूर्ण रक्कम न भरल्याचे समोर आले. त्यामुळे महसूल विभागाने आता थेट नोटीस बजावत 42 कोटी रुपयांची थकबाकी स्टॅम्प ड्युटी भरण्याचे आदेश दिले आहेत.
या रकमेत पहिल्या खरेदीखतासाठी 21 कोटी रुपये, तर करार रद्द करण्यासाठी आणखी 21 कोटी रुपये भरावे लागतील. म्हणजेच एकूण 42 कोटी रुपयांची ड्युटी कंपनीकडून वसूल केली जाणार आहे. या नोटीसीला आता पाच दिवस उलटले असले तरी कंपनीकडून कोणतीही अधिकृत कार्यवाही झालेली नाही. महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ठरविलेल्या दहा दिवसांच्या मुदतीत रक्कम न भरल्यास जमीन जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
दरम्यान, या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे. कारण अमेडिया कंपनीचे संबंध पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्याशी जोडले जात आहेत. या कंपनीमार्फत 40 एकर जमिनीचा व्यवहार करण्यात आला होता, जो सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. आता स्टॅम्प ड्युटी वसुलीची कारवाई सुरू झाल्याने प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे.
महसूल विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी दिलेली ही मुदत ही अंतिम संधी आहे. या कालावधीत कंपनीने ठराविक रक्कम भरली नाही, तर जमिनीवर थेट सरकारी ताबा घेतला जाईल. तसेच भविष्यात कंपनीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेमार्फत स्वतंत्र चौकशीही सुरू होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.







