सोलापूर : जिल्ह्यातील ११ नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गुरुवारी तिसऱ्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी ३ आणि नगरसेवकपदासाठी ३८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त योगेश डोके यांनी दिली.
पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपालिकेसाठी एकच अर्ज दाखल झाला होता. दुसऱ्या दिवशी अनगर नगरपंचायतीच्या सदस्यपदाचे ३ आणि मंगळवेढा नगरपालिकेसाठी २ अर्ज दाखल झाले. तसेच अध्यक्षपदासाठी दुधनी नगरपालिकेत २ आणि अनगर नगरपंचायतीत १ अशा ३ अर्जाची नोंद झाली. तिसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी कोणताही अर्ज दाखल झाला नाही. मात्र, सदस्यपदासाठी पंढरपूर १, अक्कलकोट १, कुडूवाडी ३, दुधनी ४ आणि अनगर १२ असे २१ अर्ज दाखल झाले आहेत. इतर जिल्ह्यातील नगरपालिकांत आजतागायत कोणताही अर्ज दाखल झालेला नाही. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी पार पडेल.







