पंढरपूर : तालुका पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी तपासणीत पंढरपूर सांगोला रोडवरील खर्डी येथे अशोक लेलँड मिनी टेम्पो, कार गाडी व 150 बॉक्स ॲड्रियल व्हिस्की नावाची दारू पकडली. गुरुवारी (दि. 13) पहाटे कारवाईत दोन लाख 16 हजाराची दारु आणि 14 लाखांची वाहने असा एकूण 16 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
याविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक टी. वाय, मुजावर म्हणाले, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने गुरूवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी केली होती.
यावेळी तेथून जाणाऱ्या अशोक लेलँड वाहनांचा संशय आल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तेव्हा ॲड्रियल व्हिस्की नावाचे दारूचे एकूण 150 बॉक्स मिळून आले. त्याची किंमत दोन लाख 16 हजार रुपये आहे. या दारुच्या साठ्यासह अशोक लेलँड टेम्पो किंमत सात लाख रुपये व कारची किंमत सात लाख रुपये असा एकूण 16 लाख 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कवितकर, विक्रम वडणे, पीएसआय भारत भोसले, मुंडे, हवालदार सुजित उबाळे, ताजोदीन मुजावर, विनायक नलावडे, तात्या गायकवाड, मंगेश रोकडे, कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी यांच्या पथकाने केली.







