सोलापूर बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एनडीएला मिळालेले घवघवीत हे बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केले. बिहारमधील भाजपा एनडीएच्या विजयाबद्दल शुक्रवारी भाजपा शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला. यावेळी आ. देवेंद्र कोठे यांनी भाजपा महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय श्रीराम’ ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘बिहार चुनाव तो झाकी है, पश्चिम बंगाल बाकी है’ अशा घोषणा दिल्या.



श्री. कुलकर्णी म्हणाले, २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बिहारमध्ये विकास घडत आहे. तेथील जंगलराज समाप्त करण्याचा निश्चय बिहारच्या जनतेने केला होता. विरोधकांनी अनेक आरोप करून देखील बिहारच्या जनतेने महागठबंधनला नाकारत भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसेच एनडीएला भरभरून यश दिले आहे. बिहारच्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असेही भाजपाचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी याप्रसंगी म्हणाले. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विश्वासमोर मोठ्या ताकतीने उभा आहे. याची जाणीव जनतेला असल्यामुळे जनतेने इतर अनेक राज्यांप्रमाणे बिहार निवडणुकीतही भाजपा आणि एनडीएला मोठे यश दिले आहे. विरोधक ईव्हीएमच्या आडून भाजपावर टीका करत होते. हा निकाल म्हणजे विरोधकांना चपराक देणारा निकाल आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नागरिकांना मिठाईचे वाटप करून जल्लोष केला.यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.







