सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम दोन वेळा पुढे ढकलला. त्यानंतर आता महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा देण्यात आला. त्यानुसार या आरक्षणाची सोडत सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा काढण्यात येणार आहे.
महापालिकेचे प्रभाग रचना अंतिम झाली आहे. प्रभागानुसार आरक्षणाची सोडत मंगळवारी करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही महापालिकांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा आदेश दिला आहे. त्यात सोलापूरचाही समावेश आहे. सोलापूर महापालिकेची नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग यासाठीचे आरक्षण सोडत सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतची माहिती दिली.









