टेंभुर्णी : हॉटेल कामगारास विवस्त्र करून लोखंडी पाईपने जबर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. टेंभुर्णी पोलिसांनी शनिवारी हॉटेल मालक लखन हरिदास माने यास अटक केली आहे. मारहाणीची ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
टेंभुर्णी बायपास हायवे येथे हॉटेल 7777 या नावाने हॉटेल आहे. या हॉटेलचा मालक लखन हरिदास माने (रा. टेंभुर्णी) याने त्यांच्याकडे कामास असलेल्या निवास आप्पासाहेब नकाते (वय 44, टेंभुर्णी) यास विवस्त्र करून सर्व कामगारांसमक्ष लोखंडी पाईपने पार्श्वभागावर बेदम मारहाण केली. याची टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत हॉटेल मालकास अटक केली. याबाबत निवास नकाते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत निवास नकाते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री 11 वा.सुमारास हॉटेल 77 77 मध्ये त्यास काम नीट का करत नाही? तुला जास्त मस्ती आली आहे काय? असे म्हणून लखन माने याने माझ्या अंगावरील सर्व कपडे काढून घेतले. माझे खिशातील दोन हजार रुपये काढून घेऊन मला नग्न करून हॉटेल बाहेर सर्व कामगारांसमोर शिवीगाळ केली. लोखंडी पाइपने माझ्या पार्श्वभागावर जोरजोराने मारहा करत शिवीगाळ केली. मी गयावया करीत असतानाही दया दाखविली नाही. तसेच जर याविषयी कोठे तक्रार केली, काम सोडले तर, तुला जीवे मारीन अशी धमकी दिली. तसेच मारहाणीचे काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश चौधरी हे करीत आहेत.







