सोलापूर : सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार, दै. लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 59 वर्ष होतं. आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिव शरीराचे दफनविधी होईल. संध्याकाळी 6 वाजता थोरला मंगळवेढा तालीम, उत्तर कसबा येथील राहत्या घरातून जडेसाब कब्रास्तान, अक्कलकोट रोड येथे होणार आहे.
एजाजहुसेन मुजावर अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार होते. संचारपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. स्व.रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क होता. गेल्या ३८ वर्षांचा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आज संपला.


सोलापूर शहरातील राजकीय, सामाजिक घटनांची त्यांच्याकडे खडानखडा माहिती होती. एका अर्थाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील घडामोडींचा संदर्भ ग्रंथ म्हणूनच आम्ही त्यांना ओळखत असू. निस्पृह , निरपेक्ष, धाडसी पत्रकारितेचा मानदंड असा त्यांचा लौकिक होता. शहर, जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असत तर नवोदित पत्रकार कोणताही संदर्भ त्यांच्याकडून जाणून घेत असत.
तीन महिन्यापूर्वी त्यांना विस्मृतीचा आजार जडला. वैद्यकीय तपासणी मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मागील आठवड्यापासून त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. आज सकाळीच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र आज गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असे कुटुंब आहे.







