सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या. एकूण 9 लाख 24 हजार 706 मतदार आहेत. त्यात 23 हजार 563 दुबार मतदार आढळून आले आहेत. 2017 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीसाठी एकूण 6 लाख 73 हजार मतदार होते. यंदा त्यात 2 लाख 51 हजार मतदारांची वाढ झाली. याद्या पाहण्यासाठी महापालिकेत कार्यकर्त्यांची गर्दी होती. त्यांनी याद्यांच्या प्रती विकत घेण्यासाठी इच्छुकांनी निवडणूक शाखेकडे धावही घेतली. या याद्यांवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. 5 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल.
आयोगाने 1 जुलै रोजी विधानसभा मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय यादी विभाजनाचे काम केले आहे. यंदा प्रभाग रचना करताना काही जुन्या प्रभागाच्या वसाहती शेजारच्या प्रभागांना जोडल्या आहेत. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर ते समोर येईल. त्यावर आक्षेप असतील तर आयसीआयसीआय बँकेच्या वर डॉ. कोटणीस हॉल येथील निवडणूक कार्यालयात लेखी नोंदवाव्यात, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिपृष्ठ दोन रुपये दराने मतदार यादीची किंमत ठरवण्यात आली असून प्रत्येक प्रभागातील मतदार यादीत फोटो नसलेली सीडी, पेन ड्राईव्हमध्ये 100 रुपयांना मिळेल. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. पहिल्या दिवशी 24 जणांनी याद्या घेतल्या. त्यांच्याकडून 74 हजार 470 रुपये जमा झाले. याद्या घेतल्यानंतर त्यावर अभ्यास करून हरकती घेतल्या जातील.
प्रभाग 26 मध्ये सर्वाधिक 45 हजार 581 मतदार आहेत. तिथे जनसंपर्क करताना उमेदवारांचा कस लागेल. सर्वात कमी मतदार तीन सदस्य असलेल्या प्रभाग 25 मध्ये आहेत. इथे 25,951 मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 20 आणि 21 असे दोन्ही एक करून प्रभाग क्रमांक 20 तयार करण्यात आला आहे. पूर्वीच्या 20 मध्ये कॉँग्रेसचे बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, परवीन इनामदार हे चार नगरसेवक निवडून आले होते. तर पूर्वीच्या 21 मधून एमआयएमचे तौफिक शेख, अझहर हुंडेकरी, तस्लीम शेख, वाहिदा शेख हे चार नगरसेवक निवडून आले होते. आता दोन्ही प्रभागातील नगरसेवक एक होऊन चारची जोडी बनवणार आहेत. मात्र स्पर्धा वाढली असून चारमध्ये कोणाला घ्यायचे हा मुद्दा आहे. तसेच प्रभाग 20 मधून काँग्रेस तर 21 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाला पसंती मिळत आहे. त्यामुळे हा तेढ सुटल्यानंतरच त्याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.







