सोलापूर : हाेटगी रस्त्यावरील नियाेजित आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर 190 फूट उंचीच्या (15 मजली)इमारती बांधू शकताे. विमानतळावरून उडणाऱ्या विमानांना त्याचा धाेका नाही. विमानसेवा प्राधिकरणाने त्याला काहीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय या पार्कवरील आयटी उद्याेगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्यासाठी एनटीपीसीचे अधिकारी येत्या २८ नोव्हेंबर रोजी भेटीसाठी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वीजदराचा करार हाेऊ शकताे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साेमवारी पत्रकारांना सांगितले.
नियाेजित आयटी पार्कसाठी हाेटगी रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील 50 एकर जमीन निश्चित केली. विमानतळापासून पाच किलाेमीटर लांब असलेल्या या जमिनीवर बहुमजली इमारती बांधण्यात येतील. त्याला काेणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. पुढील महिन्यात हाेणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीतनंतर ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया हाेईल. त्यानंतर एमआयडीसीकडून पायाभूत सुविधा देण्याचे काम हाेणार आहे.
190 फूट उंच म्हणजे 12 ते 15 मजली इमारती बांधता येतील. त्या व्यावसायिक असल्याने त्यांची उंची अधिक असते. माेठी दालने असतात. पार्किंगची सुविधा असते. त्याला काॅर्पाेरेट लूक देण्यासाठी पुरेशी जागा साेडण्यात येते. तिथे पर्यावरणपूरक गाेष्टींचा समावेश असताे. आयटीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्याचे बाह्यरूप हे पूर्णत: वेगळे असते. इमारती काचेच्या असतात. त्यामुळे बाहेरून त्याचे मजले दिसणार नाहीत. परंतु आता लक्झरियस दालने, व्हीआयपी रूम्स, कँटीन, रेस्टाॅरंट, विरंगुळा केंद्र अशा सर्व बाबींचा समावेश इमारतीत असताे. जेणेकरून तिथल्या कर्मचाऱ्यांना काेणत्याही गाेष्टीसाठी बाहेर जायची आवश्यकता नसते.







