अनगर नगरपंचायतीचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा..!
सोलापूर : अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी अवैध केला होता. त्या विरोधात त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने तो निवडणूक निर्णय अधिकाराचा निर्णय मान्य करत उज्वला थिटे टे यांचा अपील अर्ज फेटाळून लावत जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी केस डिसमिस केली आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला आहे
थिटेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
उज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांच्या वतीने जवळपास दीड तास कोर्टासमोर युक्तिवाद करण्यात आला. उज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना काय काय अडचणीत आल्या हे त्यांनी कोर्टासमोर निदर्शनास आणले. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने कारभार केला. या संदर्भात अनेक तक्रारीचा पाढा वकिलांनी वाचला. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने फ्रॉड करून सही गायब केल्याचा दावा देखील वकिलांनी कोर्टासमोर केला होता. उज्वला थिटे यांच्या वकिलांनी दीड तास केलेल्या युक्तिवादनंतर सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी आपली बाजू मांडली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
उज्वला थिटे यांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर बोलताना सरकारी वकिलांनी प्रतिउत्तर दिलं. जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार होती तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? असा सवाल राजपूत यांनी न्यायालयात उपस्थित केला. उज्वला थिटे या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार आहेत, जर त्यांच्यावर दबाव होता तर पक्षाने का कोणती भूमिका घेतली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे काम केलं ते सर्व आयोगाच्या नियमानुसार केलं आहे. त्यामुळे उज्वला थिटे यांचे अपील फेटाळण्यात यावे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. दरम्यान, सरकारी वकील यांच्या युक्तिवादनंतर राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचे वकील अॅड. महेश जगताप यांनीही युक्तिवाद केला.







