पुणे: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. ही घटना मंगळवारी (दि. २५) सायंकाळी शिक्षण विभागात घडली. याची गंभीर दखल घेत तात्काळ आणि सखोल चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांना दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी माहिती दिली आहे
बोरगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील श्रीनाथ विद्यालयातील २०१६ पासून कार्यरत सहशिक्षिकेकडून शालार्थ आयडीसाठी एक लाख रुपयांची खुलेआम लाच स्वीकारल्याची घटना पुढे आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान, शिक्षण विभागातील लिपिक शिंदे याने तक्रारदारांना १६ नोव्हेंबर रोजी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे रावसाहेब मिरगणे यांनी भेटण्यास बोलाविल्याचा निरोप दिला. मिरगणे एक लाख रुपये घेतल्याशिवाय शालार्थ आयडी देणार नाही, याची खात्री तक्रारदारांना झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नंतर पंचासमवेत त्या मिरगणेकडे गेल्या. केबिनमधील लोक निघून गेल्यावर तक्रारदार एकटेच आत गेले.
त्यांनी पत्नीच्या शालार्थ आयडीची चर्चा केली. तेव्हा मिरगणेने सांगितले की, आता ज्या लोकांची कामं झाली आहेत ना, त्या सगळ्यांनी एक-एक लाख रुपये दिले आहेत. अगदी ‘रयत’ सह कुणालाही विचारा? टेंभुर्णी, राऊळगाव, चौधरी मॅडम या सगळ्यांनी रक्कम दिली आहे, असे सांगितले. सहशिक्षिकेने, लाख रुपये जास्त होतात, काही तरी कमी करा, असे म्हणताच, तुम्ही साहेबाला भेटा, तुमचा फायदा होईल, असे म्हणून त्याने त्याच्या वरिष्ठांना भेटण्यास सांगितले. अखेर तक्रारदाराने ५० हजारांच्या खऱ्या आणि ५० हजार रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल मिरगणेच्या केबिनमध्ये दिले. लगेच साफळा लावलेल्या पथकाने मिरगणे याला रंगेहात पकडण्यात आले







