पुणे : शालार्थ आयडीला मंजुरी देण्यासाठी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे याने त्याच्या कार्यालयात १ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. तसेच त्याच्या कार्यालयात अतिरिक्त १ लाख २० हजार रुपये सापडले आहेत. हे पैसे कुठून आले? कोणत्या वरिष्ठांना द्यायचे होते का? याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितल्याने आरोपीला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.शालार्थ आयडी मंजूर करण्याकरिता १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वीकारलेल्या १ लाखाव्यतिरिक्त कार्यालयात अतिरिक्त १ लाख २० हजार रुपये सापडले. जे कोणत्याही शासकीय कामाव्यतिरिक्त होते. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून, त्याच्या हडपसर येथील ग्रीनव्हील सोसायटीमधील घराच्या झडतीमधून ५६ हजार रुपयांची रोकड आढळून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला बुधवारी विशेष न्यायालयात हजर केल्यावर सरकारी वकील अनिल कुंभार यांनी आपली बाजू मांडली.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. हे प्रकरण गंभीर असून, याची शिक्षण विभागाने याची तत्काळ दखल घेतली आहे. याची सखोल चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांना दिले आहेत. या अहवालानंतर सर्व सत्य बाहेर येईल आणि दोर्षीवर कारवाई केली जाईल.
सचिंद्रप्रताप सिंह, राज्य आयुक्त, शिक्षण विभाग
तत्परतेने कार्यवाही
पीडितेने तब्बल नऊ वर्षे विनावेतन मुलांना शिकविण्याचे काम केले. पीडितेचे पती ५ महिन्यांपासून सोलापूरहून पुण्यात उपसंचालक कार्यालयात खेटे घालले. काम झालेच नाही. अखेर एसीबीची कारवाई मंगळवारी होते आणि बुधवारी शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय सुरू होताच तक्रारदारांना शालार्थ आयडी देण्याची तातडीने कार्यवाही करण्यात आली.







