बार्शी : तालुक्यातील शेळगाव आर ते कळमण रस्त्यावर असलेल्या शेरखानी वस्तीमध्ये मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. संदीप शेरखाने यांच्या शेतातील विहिरीतून मोटार काढण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी 4 वर्षांचा मुलगा शिवराज खेळता-खेळता शेतातील ट्रॅक्टरमध्ये चढला. सीटवर बसताच ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि रिव्हर्स गिअरमध्ये वेगाने मागे सरकत थेट 50 ते 60 फूट खोल विहिरीत कोसळला.
शिवराजचे वडील हे दृश्य पाहताच जीव तोडून धावले. त्यांनी मुलाला पकडण्याचा अत्यंत आर्त प्रयत्न केला, पण फक्त काही इंच अंतराने त्यांचा हात रिकामा राहिला. ट्रॅक्टर क्षणार्धात खोल विहिरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच गावातील युवकांनी स्वतः विहिरीत उड्या मारून शिवराजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि ट्रॅक्टर त्याच्यावर कोसळल्याची शक्यता असल्याने बचावकार्य अधिक गुंतागुंतीचे बनले.
काही मिनिटांत प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. बार्शी अग्निशमन दल, 108 रुग्णवाहिका, वैराग पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ग्रामस्थांनी बचाव मोहिमेला हातभार लावला. पहाटेच्या सुमारास विहिरीतील बहुतांश पाणी उपसल्यानंतर तळाशी ट्रॅक्टरचा मागचा भाग दिसू लागला. त्याचवेळी छोट्या शिवराजचा मृतदेह पाण्यातून बाहेर आला
12 तास चाललेले बचावकार्य
1… पहिला प्रयत्न फसला…. ट्रॅक्टर विहिरीत खोल वाकलेल्या अवस्थेत असल्याने आणि पाण्याचा दाब असल्याने क्रेनने निघाला नाही. त्यानंतर पाणी उपसण्याचा निर्णय घेण्यात आला.
2… पहाटेपर्यंत प्रयत्न…. 5 ते 7 मोठ्या एचपी मोटारी लावून सलग पाणी उपसण्याचे काम सुरू झाले. शिवराजला वाचवता येईल या आशेने पहाटेपर्यंत शेकडो लोकांनी श्वास रोखून ठेवला.
3… 12 तास बचावकार्य…. दु. 4:30 वा. सुरू झालेले बचावकार्य पहाटे 4:30 वाजेपर्यंत सलग सुमारे 12 तास अखंडपणे चालूच होते.







