सोलापूर : सोलापुराचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वारा समोरील अतिक्रमण काढून हा परिसर सुशोभित करावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केली. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर अशा मंदिरांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर
भाविक येतात. श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि परिसराचा विकास झाला तर हे भाविक सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समांतर जलवाहिनीसाठी गेल्या हिवाळी अधिवेशनात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सोलापूर शहराला रोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था यासाठी ८९२ कोटी रुपयांची आवश्यकता होती. या मागणीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याकामाची निविदा आठ दिवसात काढण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले आहे.
सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. त्याकरिता बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन नागपुरातील हैदराबाद हाऊस (मुख्यमंत्र्यांचे कार्यालय) येथील कार्यालयात मुख्य सचिवांची भेट घेतली. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. यानंतर मुख्य सचिवांनी गोविंदराज यांना जयकुमार गोरे याबाबत निर्देश दिले. यानंतर पालकमंत्री आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी गोविंदराज यांचीही भेट घेतली. तसेच महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनाही याबाबत सूचना केल्या आहेत.










