महसूल मंत्री बावनकुळे यांच्या घोषणेने शेतकऱ्यांत समाधान
सोलापूर : ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी वा इतर कारणांमुळे नोंदणी करू शकलेले नाहीत. त्यांच्यासाठी आता सरकारने दिलासा देत ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे शेतकरी बांधवांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
‘ई-पीक पाहणी’ ची ऑनलाईन मुदत संपल्याने हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने आता ‘ऑफलाईन’ पीक पाहणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी राहून गेली आहे, त्यांना आता १५ जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.







