सोलापूर: दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाकडून ता. १७ व १८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. विजयकुमार उबाळे यांनी पत्रकार परिषद दिली.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय येथे हे संमेलन होणार आहे.
या संमेलनस्थळाला डॉ. द. रा. बेंद्रे साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे, प्रमुख कार्याध्यक्ष डॉ. महेश चोप्रा असून, उद्घाटक श्रीकांत मोरे राहणार आहेत.
बुधवारी ग्रंथ दिंडी बुधवार, दि. १७ रोजी सकाळी आठ वाजता शिक्षणाधिकारी डॉ. सचिन जगताप यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरुवात होईल. उद्घाटन श्रीकांत मोरे यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य परंपरा आणि योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुसऱ्या सत्रात आवाज कौशल्य हा कार्यक्रम राहुल कदम सादर करणार असून, संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा होणार कार्यक्रम आहे. तिसऱ्या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातील साहित्य निर्मिती या विषयावर परिसंवाद डॉ. आनंद काटीकर यांच्या अध्यक्षतेखाली आहे. चौथ्या सत्रात माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली काव्य मैफल आहे…
दि. १८ रोजी कथाकथन हा कार्यक्रम योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लेखक संवाद हा कार्यक्रम डॉ. महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. मराठी बोलीभाषा : सौंदर्य आणि अभिजात या विषयावर डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे. चौथ्या सत्रात प्रसार माध्यमे : भाषा संवर्धन आणि साहित्य निर्मिती या विषयावर रजनीश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, डॉ. राजशेखर शिंदे, प्राचार्य डॉ. एस. जे. गायकवाड आदी उपस्थित होते.







