पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढला आदेश..
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नॉर्थकोट प्रशाला येथे कार्यालय असणार आहे. नॉर्थकोट प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर परिघापर्यंत तीन पेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने आणण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याचा आदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शुक्रवारी काढला आहे.
या आदेशात नामनिर्देशन भरणाऱ्या व्यक्तींसाठी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींसाठी विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नॉर्थकोट प्रशाला येथे कार्यालय असेल, त्यामुळे नॉर्थकोट प्रशाला येथील मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर परिसरात तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहने आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.पोलिसांनी ठरवून दिलेल्याच ठिकाणी गाड्या पार्क कराव्या लागतील. प्रत्येक उमेदवारास अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात एकावेळी उमेदवार, सूचकासह पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर परिसरात कोणताही प्रचार करणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे, तसेच गाणी वाजवणे, यावर निर्बंध घातले आहेत. हा आदेश २३ डिसेंबरपासून ३ जानेवारीपर्यंत लागू असेल, असे आदेशात म्हटले आहे.










