सोलापूर : सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भारतीय जनता पार्टीने मध्यरात्री मोठा दणका दिला आहे. सोलापूर राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ असलेले नगरसेवक किसन जाधव आणि राष्ट्रवादी नागेश गायकवाड यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला.

किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतमधील प्रवेशामुळे सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. सोमवारपर्यंत आणखी काही धक्के बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहर मध्यमध्ये जाधव आणि गायकवाड या दोघांच्या भाजप प्रवेशानंतर आता शहर उत्तर मध्ये मोठा धमाका होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. घासाघाशीनंतर सोमवारपर्यंत किंवा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी ताणलेली गाठ सैल होऊन अनेक नेते पक्ष निष्ठेला तिलांजली देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्व स्वीकारत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भाजपात प्रवेश निश्चित केला. तर आता शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भाजपात मोठा प्रवेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जाधव आणि गायकवाड यांचा बालाजी सरोवर हॉटेलमध्ये मध्यरात्री प्रवेश झाला.










