सोलापूर : अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या भैय्या चौक येथील एसीएस हॉस्पिटलतर्फे शनिवार, २७रोजी सकाळी ९.३० वाजता डफरीन चौकातील आयएमए सभागृहात सर्वसामान्य नागरिकांसाठी हृदयरोगाशी संबंधित जनजागृती प्रदर्शन व थेट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकाचे उद्घाटन प्रिसीजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, पत्रकार मनीष केत, आरएमईएचे चेअरमन नीलकंठ वाकचौरे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड-पाटील, डॉ. राहुल कारीमुंगी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी प्रगत हृदयविकार उपचार तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामग्री सोलापूरकरांना पाहता येणार आहे. तसेच एन्जोप्लास्टी म्हणजे नेमके काय, ती कशी केली जाते, स्टेंट कसा बसवतात, हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया कशी केली जाते, आर्टिफिशियल हार्ट म्हणजे काय, हृदयरोगावरील उपचारासाठी एआयचा वापर कसा होतो याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच प्रगत उपचार पध्दतीचे थेट प्रात्यक्षिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे.सध्या हृदयरुग्ण असलेले, यापूर्वी हृदयरोगावर उपचार घेतलेले नागरिक तसेच ज्याला स्वतःच्या आणि आपल्या जिवलगांच्या हृदयाची काळजी आहे, असा प्रत्येकजण या प्रदर्शनीला भेट देऊ शकतो. सोलापूरकरांनी हृदयरोगाबाबत पडणाऱ्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे मिळवण्यासाठी या जनजागृती प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










