जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे नव्याने दाखल माजी नगरसेवकांची कोंडी..
सोलापूर : भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने प्रवेश दिलेल्या 22 प्रभागातील नगरसेवकांची गोची होणार असून भाजप पक्ष कार्यालयाकडून जुन्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारीबाबत शब्द देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असून त्यामुळे नव्याने भाजप पक्षात प्रवेश घेतलेल्या माजी नगरसेवकांची गोची होणार आहे.
नव्याने २२ प्रभागांतील माजी नगरसेवकांना भाजपात प्रवेश देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत व दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वर्षानुवर्षे भाजपासाठी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून करण्यात आलेल्या या प्रवेशामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत असून, ही नाराजी येणाऱ्या मनपा निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या असंतोषाची दखल थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. जुन्या भाजप पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा सूर स्थानिक पातळीवर उमटू लागल्यानंतर मुंबईतील भाजप कार्यालयाकडून महत्त्वाचे आश्वासन देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, येणाऱ्या मनपा निवडणुकीत जुन्या आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्याने उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले आहे. यामुळे उत्साहाच्या भरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका बाजूला भाजप आपली संघटनात्मक ताकद टिकवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसऱ्या बाजूला नव्याने आलेल्या नेत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणूक केवळ बाहेरील पक्षांशी नव्हे, तर भाजपातील अंतर्गत समतोल राखण्याचीही मोठी कसोटी ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.











