सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १४६० उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री १० च्या सुमारास पूर्ण झाली. यामध्ये सुमारे २३० अर्ज नामंजूर ठरले असून १२३० अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. दरम्यान गुरुवारी काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.मागील तीन दिवस प्रचंड गजबजलेले नॉर्थकोट परिसर आज तुलनेने शांत दिसून आला. सलग दोन दिवसांच्या तणावपूर्ण बंदोबस्तानंतर पोलिस यंत्रणेलाही काहीसा विसावा मिळाला आहे.
सोलापूर महापालिका निवडणूक अंतर्गत अर्ज छाननी प्रक्रियेच्या दिवशी मात्र नॉर्थकोट परिसरात अक्षरशः रणसंग्रामाचे वातावरण होते. एकमेकांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यावरून उमेदवार, कार्यकर्ते व समर्थकांमध्ये जोरदार वादविवाद झाले. अनेक वेळा परिस्थिती चिघळत असल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे दिवसभर तणावाचे वातावरण होते.दरम्यान, उद्या दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतरच कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढवणार याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. सध्या अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असल्याने माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या साऱ्या गोंधळात आणखी भर पडली ती प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत याद्यांच्या गोंधळाची. बहुतेक सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा रीतसर प्रसारमाध्यमांमध्ये केलेली नाही. भाजपाची उमेदवारांची यादी सोशल मीडियावरून व्हायरल झाली असली, तरी पक्षाकडून अधिकृतरित्या ती अद्याप वितरित करण्यात आलेली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांच्या याद्याही आज दुपारपर्यंत अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नव्हत्या.

या सगळ्या प्रक्रियेत प्रशासनाच्या संथ कारभारावरही नाराजी व्यक्त होत आहे. एकूण किती उमेदवारी अर्ज दाखल झाले याची अधिकृत आकडेवारी तब्बल १९ तासांनंतर, बुधवारी जाहीर करण्यात आली. छाननी रात्री पूर्ण होऊनही उर्वरित वैध उमेदवारांची प्रभागनिहाय यादी आज दुपारी १२ वाजल्यानंतरच प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात येऊ लागली. या दिरंगाईमुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
एकूणच, अर्जछाननीनंतरचा गोंधळ ओसरला असला तरी माघारीनंतरच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे खरे राजकीय गणित स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र सर्वांचे लक्ष उद्याच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे.










