सातारा : साताऱ्यात आयोजित अखिल भारतीय मराठी संमेलनात आज एक खळबळजनक घटना घडली. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला आज एका व्यक्तीने काळे फासले. हा व्यक्ती रिपाइंचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला जात आहे. त्याने विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे का फासले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी सकाळी साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी संमेलनात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना संदीप जाधव नामक एका व्यक्तीने संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला. त्याने विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वचजण स्तब्ध झाले. स्वतः कुलकर्णी यांनाही काहीक्षण काय झाले हे समजले नाही. संदीप जाधव यांनी हा हल्ला का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ते रिपाइंचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात गळ्यात निळा रुमाल असलेले संदीप जाधव ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा देत विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासताना दिसत आहेत. काळे फासल्यानंतर हल्लेखोर व्यक्ती राष्ट्रगीत म्हणतानाही व्हिडिओत दिसत आहे. ही घटना व्यासपीठावर जाणाऱ्या पायऱ्यांजवळ घडली. त्यानंतर आयोजकांनी विनोद कुलकर्णी यांना सावरत दुसऱ्या बाजूला नेले. शाहूपुरी पोलिसांनी आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले आहे. त्यांनी गनिमी कावा करून हे आंदोलन केले. केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे.










