आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली मतदान साहित्याची पाहणी
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या साहित्याची पाहणी केली मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हीएम व संबंधित यंत्रणा, मतदार यादी, मतपेट्या, सील, मतदान केंद्रांवरील फर्निचर, विविध फॉर्म्स व स्टेशनरी साहित्य, मतदारांची ओळख पटविण्यासाठी लागणारी सामग्री तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधा यांचा आढावा घेण्यात आला. साहित्याची संख्या, गुणवत्ता आणि वेळेत वितरण होण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी साहित्य वितरणाची व्यवस्था काटेकोरपणे राबवावी, तसेच सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश डॉ. ओम्बासे यांनी दिले. मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, शांततापूर्ण आणि लोकशाही मूल्यांना अनुसरून पार पडेल, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेशही त्यांनी यावेळी दिले.










