..!
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन
सोलापूर : सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्क सुरू करण्याला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी जामगोंडी मंगल कार्यालयात झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याकरिता भाजपा कटिबद्ध आहे. सोलापुरात आयटी पार्कचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाकडून मागणी करण्यात येईल.

भाजपाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :1) सोलापूर शहरासाठी पुढील १०० दिवसात १०० ई बस शहरातील रस्त्यांवर कार्यान्वित करणार.
2)धूळमुक्त सोलापूरसाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेवर भर देणार.
3) प्रत्येक प्रभागात क्रीडांगणे उद्याने बांधणार.
4) हद्दवाढ भागात अत्याधुनिक रुग्णालये उभारणार.
5) महापालिकेच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचारदेखील जनतेला उपलब्ध करून देणार.
6) गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार.
7) शहरातील विविध भागात सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार.
8) महिलांसाठी पिंक टॉयलेट उपलब्ध करून देणार.
9) हद्दवाढ भागात मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या जातील.
10) प्रत्येक प्रभागात प्रभाग कार्यालय, एक खिडकी सेवा देणार.
11) कर प्रणालीत सुसूत्रता आणून नागरिकांवरील कराचा बोजा कमी करणार.
12) बांधकाम परवाना प्रक्रियेत सुलभता आणणार.
13) जन्म मृत्यू दाखले विभागीय कार्यालयातच मिळणार.
14) एमआयडीसीमध्ये सुविधा उपलब्ध करून देणार.
15) वस्त्रोद्योगाला चालना देणार.











