सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) आणि पीएम उषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फंक्शनल मटेरियल्स अँड अॅप्लिकेशन्स’ या विषयावर आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परिषदेचा समारोप प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या समारोप समारंभास भाभा अनुसंशोधन केंद्राच्या डॉ. शाश्वती सेन, डॉ. एस. एच. पवार, डॉ. बी. जे. लोखंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य देवानंद चिलवंत, डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक तथा परिषदेचे आयोजक डॉ. विकास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून परिषदेचा उद्देश व आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
परिषदेदरम्यान फंक्शनल मटेरियल्स, नॅनोमटेरियल्स, ऊर्जा साठवण प्रणाली, जैववैद्यकीय उपयोग, औद्योगिक संशोधन तसेच शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. देशातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि महाविद्यालयांतील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला.

परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना समारोप समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. शाश्वती सेन यांनी संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संशोधनाकडे वळावे, असे आवाहन केले. प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी अशा राष्ट्रीय परिषदा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवृद्धी, संशोधन प्रेरणा आणि व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे मत व्यक्त केले. परिषदेमुळे विद्यापीठातील संशोधन संस्कृती अधिक बळकट होण्यास मदत झाली असून भविष्यात अशा उपक्रमांमधून विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्वी पटेल यांनी केले. या राष्ट्रीय परिषदेच्या संयोजनामध्ये डॉ. उजमा बांगी ,श्री एस एन पवार एस.डी घोंगडे, डॉ. विपुल प्रक्षाळे डॉ.प्रसन्ना गव्हाणे, डॉ. वैभव बच्चूवार, अश्रुबा वाघमारे अविनाश मोलाने, शिवानी गावंडे, सर्जेराव सुतार डॉ स्नेहल पाटील,पृथ्वी दळवी यांनी राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी पणे पूर्ण करण्याकरिता परिश्रम घेतले











