सोलापूर : श्री ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना उद्या (शनिवारी) शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनाने प्रारंभहोत असल्याची माहिती नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यात्रेतील धार्मिक विधीबाबत माहिती देताना हिरेहब्बू म्हणाले, उत्तर कसबा येथील कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातील योगदंड उद्या (शनिवारी) सकाळी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात आणला जाईल. त्यानंतर योगदंडाचे विधिवत पूजन, होम हवन व पाद्यपूजा होईल. उपस्थित भाविकांना महाप्रसाद दिल्यानंतर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभहोणार आहे.
११ जानेवारी रोजी मध्यरात्री मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम, १२ जानेवारी रोजी सकाळी नंदीध्वजांचे पूजन झाल्यानंतर हिरेहब्बू वाड्यापासून मानाचे सातही नंदीध्वज व पालखीची सवाद्य मिरवणूक तैलाभिषेकासाठी श्री सिध्देश्वर मंदिराकडे मार्गस्थ होणार आहेत. मंदिरात आल्यानंतर अमृतलिंगास तैलाभिषेक करण्यात येईल. त्यानंतर मुख्य मंदिरात व योगसमाधीची महापूजा करून नंदीध्वज ६८ लिंगांच्या

तैलाभिषेकासाठी जाणार आहेत. १ ३ जानेवारी रोजी नंदीध्वजांचा अक्षता सोहळा असून त्यासाठी सकाळी सात वाजता मानाचे नंदीध्वज मिरवणुकीने निघणार आहेत. संमती कट्ट्याजवळ नंदीध्वज व पालखी आल्यानंतर धार्मिक विधी होऊन अक्षता सोहळा पार पडणार आहे. १४ जानेवारी रोजी योगदंडास करमुटगी लावून सिध्देश्वर तलावात स्नान व गंगापूजन केला जाणार आहे. सायंकाळी होमविधीसाठी नंदीध्वज होम मैदानाकडे निघणार आहेत. पसारे वाड्याजवळ पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधल्यानंतर नंदीध्वज होम मैदानावर येतील. होम कट्ट्यावर होमविधीचा धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर रात्री भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. १५ जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेचे दारूकाम असून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नंदीध्वज मिरवणुकीने होम मैदानाकडे निघणार आहेत. १६ जानेवारी रोजी कप्पडकळीने श्री सिध्दरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधीची सांगता होईल, असे हिरेहब्बू यांनी सांगितले. यावेळी मनोज, जगदीश, संजय, विकास, धनेश, विनोद, संतोष, सागर व प्रथमेश हिरेहब्बू, श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, नंदीध्वजाचे मानकरी, मानकरी कुंभार, नंदीध्वजांचे मास्तर व नंदीध्वजधारक उपस्थित होते.










