एसआरपी एफ कॅम्प परिसरात ठरली होती पंधरा लाखाची डील.
सोलापूर : पोलिसावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पंधरा लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
पूजा ढवळे (वय ३७, रा. शिवगंगा नगर), मिलिंद कांबळे (वय ४७, रा. बुधवार पेठ), लक्ष्मी लोंढे (वय ४५, रा. एसआरपीएफ कैंप जवळ) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र रामहारी भोसले (वय ४२, रा. पंचरत्न निवास, नेताजी नगर, जोडभावी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर जोडभावी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी पंधरा लाखांची मागणी केली.
ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोन करून भोसले यांना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलवले. याची तक्रार भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली.घटनेची खात्री करण्यासाठी सपोनि विष्णू गायकवाड यांनी दोन पंचासोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावला.
भोसले यांनी आरोपींना ५०,००० रुपये रोख, दीड लाखांचा व एक तेरा लाखांचा असे दोन चेक दिले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तेथे येऊन भोसले यांनी दिलेली रक्कम व २ चेकसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वरील तीन या आरोपींवर बी एन एस ३०८ (२), ३५१ 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.










