सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
सोलापूर: आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत, बेकायदेशीर रीत्या शस्त्रविक्रीसाठी आलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोषी रोकडे आणि भारत पाटील यांना ११ जानेवारी २०२६ रोजी एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली होती. “डी.आर.एम. रेल्वे ऑफिसच्या बाजूला असलेल्या रेल्वे कॉलनीच्या वॉल कंपाउंडजवळ, मोकळ्या जागेत तीन संशयित इसम एका काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलसह थांबले असून, त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे आहेत,”
अशी माहिती मिळताच गुन्हे शाखेने तातडीने फिरवली चक्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने या तिघांनाही जागेवरच ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १. महमंदरफिक लालसाब जातगर उर्फ मनगोळी (वय २६, रा. जातगर वस्ती, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक).२. राजा नूरजानसाब सौदागर (वय २६, रा. भारत नगर, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक).३. प्रदीप सूर्यकांत काळभोर (वय ३५, रा. लोणी स्टेशन जवळ, लोणी काळभोर, पुणे).
झडतीत काय मिळाले? पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता: राजा सौदागर याच्याकडे कमरेला खोचलेले १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि खिशात ५ जिवंत काडतुसे सापडली. प्रदीप काळभोर याच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे मिळून आली.गुन्ह्यात वापरलेली हौंडा युनिकॉर्न मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, ही शस्त्रे त्यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने आणली होती. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कामगिरी: ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पथकातील सदस्य: स.पो.नि. दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुद्गल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिध्दाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड आणि सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व चालक सतिश काटे, बाळू काळे.










