मुंबई : ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नाही, त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. अशा मतदारांना मतदान केंद्रावर ‘वोटर स्लिप’ म्हणजेच निवडणूक पावती आणि त्यासोबत अन्य सरकारमान्य फोटो असलेले ओळखपत्र दाखवून मतदान करता येते. निवडणूक स्लिप ही केवळ मतदान केंद्र, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक सांगणारी पावती असते, त्यामुळे ती एकटी पुरेशी नसते. ओळख पटवण्यासाठी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदार यादीत नाव कसे शोधावे?
- निवडणुकीच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी मतदारांनी आधीच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मागील निवडणुकीत नाव यादीत असते, म्हणून यावेळीही असेल, असा समज केला जातो. मात्र प्रत्यक्षात मतदार याद्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी अद्ययावत केल्या जातात. स्थलांतर, मृत्यू, नावातील दुरुस्ती, पत्त्यातील बदल किंवा प्रशासकीय चुका यामुळे काही वेळा नाव वगळले जाऊ शकते.
- मतदार यादीत नाव तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने सोपी आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन कोणताही नागरिक काही मिनिटांत आपले नाव तपासू शकतो. ‘Voter Helpline’ ॲपच्या माध्यमातूनही हीच सुविधा उपलब्ध असून, मोबाईलवरूनच संपूर्ण माहिती मिळू शकते. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अप्रिय धक्का बसू नये, यासाठी आधीच खात्री करून घेणे गरजेचे आहे.
- ऑनलाईन पद्धतीने नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.inया संकेतस्थळावर जावे लागते. वेबसाईटच्या मुख्य पानावर ‘Search by Details’, ‘Search by EPIC’ आणि ‘Search by State’ असे तीन पर्याय उपलब्ध असतात. यासोबत कॅप्चा कोड भरून सर्च करता येते. आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक केल्यास मतदार यादीतील तपशील स्क्रीनवर दिसतो.
- नाव, EPIC नंबर, मतदान केंद्र, भाग क्रमांक आणि इतर माहिती येथे पाहता येते. जर एका पद्धतीने नाव सापडले नाही, तर उर्वरित दोन पर्यायांचा वापर करता येतो. तरीही नाव न सापडल्यास संबंधित राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मतदार यादीतील तपशीलात काही चूक असल्यास, निवडणुकीच्या किमान दहा दिवस आधीपर्यंत दुरुस्ती करून घेण्याची संधी उपलब्ध असते.
- एसएमएसद्वारेही मतदार यादीतील नाव तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी एसएमएस टाईप करताना आधी स्पेस द्यायची आणि नंतर मतदार ओळखपत्र क्रमांक लिहायचा. हा मेसेज 9211728082 किंवा 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो. प्रत्युत्तरात मतदाराचा भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव एसएमएसद्वारे मिळते. नाव यादीत नसेल तर ‘No Record Found’ असा संदेश येतो.
- याशिवाय voters.eci.gov.in या संकेतस्थळावरूनही नाव शोधण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. ‘Search Your Name in Voter List’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर EPIC नंबर, वैयक्तिक माहिती किंवा मोबाईल नंबरद्वारे नाव शोधण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ‘Search by Details’ निवडल्यास राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वय आणि लिंग अशी माहिती अचूक भरावी लागते.
- सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून ‘Search’ वर क्लिक केल्यास मतदाराचा तपशील समोर येतो. ‘View Details’ वर क्लिक करून मतदान केंद्राची सविस्तर माहिती पाहता येते. यामध्ये मतदान केंद्राचा पत्ता, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक दिलेला असतो. हीच माहिती मतदानाच्या दिवशी अत्यंत उपयुक्त ठरते.
- या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदार माहितीची स्लिप डाऊनलोड करणे. ‘Print Voter Information’ या बटनावर क्लिक करून पीडीएफ स्वरूपातील स्लिप डाऊनलोड करता येते. ही स्लिप प्रिंट करून मतदानाच्या दिवशी सोबत ठेवल्यास मतदान केंद्र शोधणे आणि ओळख पटवणे अधिक सोपे होते. मात्र लक्षात ठेवावे, ही स्लिप एकटी पुरेशी नसून फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक आहे.










