सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली असून, नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते तसेच विविध समित्यांच्या कार्यालयांचे नूतनीकरण व सज्जतेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
ही सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॉन्सील हॉल, महापौर व उपमहापौर कार्यालय, विरोधी पक्ष कार्यालय तसेच विविध समित्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी कामाचा दर्जा, वेळेत पूर्णत्व, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची सविस्तर तपासणी केली.मा. आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, सर्व कार्यालये नागरिकाभिमुख, प्रशासकीय कामकाजास अनुकूल व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असावीत.

कॉन्सील हॉलमध्ये सभासदांसाठी योग्य आसन व्यवस्था, ध्वनी व दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) प्रणाली, वातानुकूलन, स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.नूतनीकरणाची कामे गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून पदग्रहण सोहळे व आगामी सभांसाठी सर्व कार्यालये पूर्णतः सज्ज ठेवावीत, असे निर्देशही मा. आयुक्तांनी दिले. तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींना एकाच ठिकाणी समन्वयाने काम करता यावे, यासाठी कार्यालयीन मांडणी सुयोग्य पद्धतीने करण्याचे निर्देश दिले.

या पाहणीमुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय व राजकीय कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होणार असून, लवकरच महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते व विविध समित्यांची कार्यालये पूर्णपणे सज्ज होणार आहेत.यावेळी नगरसचिव प्रवीण दंतकाळे, नगरअभियंता सारिका अक्कलुवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, सहअभियंता (विद्युत) महादेव इंगळे, नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते











