सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात आज एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. शिक्षणमहर्षी स्वर्गीय दीनानाथ कमळे गुरुजी यांचे नातू आणि सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे प्रमुख विश्वस्त नागेश बिराजदार यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख आणि युवानेते मनीष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
शिक्षणाचे मोठे जाळे भाजपच्या पाठीशीनागेश बिराजदार हे सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या नामांकित शिक्षण संस्थेचे नेतृत्व करतात. या संस्थेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यात माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, मागासवर्गीय वसतिगृहे आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे मोठे जाळे विणले गेले आहे. बिराजदार यांच्या भाजप प्रवेशामुळे या शैक्षणिक चळवळीतील एक मोठा गट आता भाजपच्या विचारधारेशी जोडला गेला आहे, ज्याचा मोठा फायदा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला होण्याची शक्यता आहे.
विकासाच्या प्रवाहात सहभाग आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग आणि मनीष देशमुख यांचे युवकांमधील संघटन कौशल्य पाहून आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे नागेश बिराजदार यांनी यावेळी सांगितले. कमळे गुरुजींचा शैक्षणिक वारसा पुढे नेत असताना आता राजकीय माध्यमातून समाजसेवा अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
यावेळी उद्योजक गणेश कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, उद्योजक निलेश कोळी, नूतन नगरसेवक दीपक जमादार संतोष पाटील, सुदर्शन जंगम, संतोष घोडके, श्रीनिवास बुरुडकर यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.