सोलापूर :- दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये इयत्ता 12 वी ची परीक्षा व दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत इयत्ता 10 वी ची परीक्षा होणार आहे. इयत्ता 10 वी साठी परीरक्षक केंद्र 15 असुन एकुण 188 परीक्षा केंद्रामधुन 64,454 विद्यार्थी आणि इयत्ता 12 वी साठी परीक्षा केंद्र 11 असुन, एकुण 119 परीक्षा केंद्रामधुन 54,875 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय 07 भरारी पथक तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असुन विभाग स्तरावर 03 भरारी पथके कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची दक्षता घेणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध राहतील व सदर चित्रीकरणाची साठवणूक करणेबाबत निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व अतिसंवेदनशील व संवेदनशील केंद्रांची संवेदनशील केंद्राची माहिती घेवून याबाबत पोलीस प्रशसनाच्या मदतीने कडक उपाययोजना करणेत येणार आहेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करणेत येणार आहे. तसेच परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या वेळेत बंद ठेवणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांनी दक्षता घ्यावी. अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी दिली आहे.










