सोलापूर शहर वाहतूक शाखेची कारवाई
सोलापूर: सोलापूर शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकींच्या सुधारित (मॉडिफाय) सायलेंसरवर शहर वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. जप्त केलेले ५२५ सायलेंसर रोड रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांना त्यांचे सायलेंसर परत नेण्यासाठी १० दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णालयातील रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन, विहित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध ही मोहीम राबवण्यात आली. वारंवार दंड करूनही सुधारणा न करणाऱ्या वाहनधारकांचे सायलेंसर काढून घेण्यात आले होते. १ जानेवारी २०२५ ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत दक्षिण विभागातून ४१० आणि उत्तर विभागातून ११५ असे एकूण ५२५ सायलेंसर जप्त करण्यात आले. वरिष्ठांच्या मान्यतेने २२ जुलै २०२५ रोजी या सर्व ५२५ सायलेंसरवर रोड रोलर फिरवून ते कायमचे निकामी करण्यात आले आहेत.
ज्या वाहनधारकांचे सायलेंसर वाहतूक शाखेने जप्त केले होते, त्यांनी आपले निकामी झालेले सायलेंसर पुढील १० दिवसांत शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधून घेऊन जावेत. मुदतीनंतर शिल्लक राहिलेल्या सायलेंसरची प्रशासकीय स्तरावर विल्हेवाट लावली जाईल, असे शहर वाहतूक शाखेची सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले आहे












