सोलापूर ; ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाच महिन्यांपूर्वी शब्द देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पुनर्वसन होत नसल्याचे पाहून माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतला. यापुढे शरद पवार आणि आपला संपर्क असणार नाही, असे साठे यांनी निक्षून सांगितले. मात्र, कुठल्या पक्षात जायचं हा निर्णय तूर्तास स्थगित ठेवून आगामी निवडणुका ह्या साठे गट म्हणून लढविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदारून उचलबांगडी करत त्या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची वर्णी लावण्यात आली होती. तेव्हापासून साठे हे नाराज होते. मात्र, पवारांनी त्यांची समजूत काढून सोलापूर जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष नेमण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्याला पाच महिने होऊनही निर्णय होत नसल्याने बळीराम साठे यांनी परवा पक्ष सोडण्याची घोषण केली होती.

साठे म्हणाले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यांच्या साथीला आमदार अभिजीत पाटीलही आहेत. मला पक्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघाला नाही. मला डावलून तालुकाध्यक्षांच्या परस्पर निवडी करण्यात आल्या. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला
उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्यात येतील. कोणत्या पक्षात जायचं, हा निर्णय तुर्तास स्थगित ठेवण्यात येत आहे. निवडणुकीनंतर त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही साठे यांनी स्पष्ट केले.
माझं राजकारण संपवण्याचा विडा माजी आमदार यशवंत माने यांनी उचलला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही बळीराम साठे यांनी माजी आमदार माने यांच्यावर केला.








