सोलापूर : ‘दिन दिन दिवाळी गायी-म्हशी ओवाळी’ हे गाणं तुमच्या अनेकांना आठवत असेल. विशेषतः दिवाळी सणाच्या वेळी या गाण्याची अनेकांना आठवण होते. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. आज, शुक्रवार वसुबारस सणाचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी गायीच्या पूजेला मोठे महत्त्व आहे. दरम्यान, वसुबारसच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात. ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नन्दिनी ।।
अर्थ हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर अशी प्रार्थना करतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गायी उपलब्ध नसतात. अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करता येते. तेही शक्य नसल्यास गायीच्या चित्राची पूजा करता येते. मात्र, अशा वेळेस गायीच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे.

दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात राहावयाचे असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दिवाळी साजरी करण्याची पद्धती जवळजवळ सारखीच आहे. मुख्यतः घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात.







