सोलापूर : दिवाळी सणासाठी तसेच माहेरी येणाऱ्या लाडक्या बहिणीं व नागरिकांची सोय व्हावी म्हणून सोलापूर एसटी आगाराच्या वतीने सोलापूर पुणे मार्गावर जादा ६० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना सध्या शाळेच्या सुट्ट्या लागल्या असून त्यांना मामाच्या गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. त्याचबरोबर सासुरवाशीन सुनेलाही माहेराची आतुरता असून या सर्वांच्या सोयीसाठी राज्य परिवहन एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. एसटी महामंडळाच्यावतीने सोलापूर-पुणे प्रवाशांसाठी जादा ६० गाड्यांचे नियोजन केले आहे. एसटी बरोबरच रेल्वेने ही दिवाळी करता वाढीव फेऱ्यांचे नियोजन केले आहे. दिवाळीसाठी जालना- तिरुचहानुर दरम्यान विशेष गाडी सुरू आहे. या गाड्यांचे १४ फेऱ्या आहेत. ही गाडी सोलापूर विभागातील दहा स्थानकावर थांबणार आहे. एसएमव्हीटी बेंगळुरू बिदर या मार्गावरही विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील कलबुर्गी-शहाबाद आणि वाडी स्थानकावर या गाडीला थांबा आहेत.
विमानसेवेलाही प्रतिसाद
दिवाळीनिमित्त दळणवळणाचे साधन म्हणून लालपरी, खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स बसेस व रेल्वेची सुविधा आहे. मात्र यंदाच्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर- मुंबई ही विमानसेवा सुरू केल्याने सध्या विमानसेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी वेळामध्ये जाता येत असल्याने सोलापूरकरांना विमानसेवा फायद्याची ठरत आहे.











