सोलापूर: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप पक्षप्रवेशाआधीच पक्षात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्ते सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना दिसले. जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे.
याविरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन सुरू केलं होतं. घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्याने केली आहे. दरम्यान आंदोलनावेळी भाजपमध्ये दिलीप माने यांचा प्रवेश मान्य नाही अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोहोचल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कलंकित नेत्यांना प्रवेश नको अशी जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरु केला, त्यानंतर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरयांनी सर्वांची समजूत घातली आणि सर्वांची निवेदने घेतली
आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, दक्षिण सोलापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहेत त्यासंदर्भात आंदोलन केलेलं आहे. परंतु भाजपची भूमिका स्पष्ट आहे, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या समवेत या सर्व गोष्टींची चर्चा होऊन हे निर्णय होत असतात. त्यामुळे शहराचा फार मोठा मोठा सहभाग नसतो. जेव्हा अशा मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेश पक्ष करत असतो तेव्हा पार्टीने त्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घेतलेला असतो विचार केला असेल, पार्टीने या संदर्भात काहीतरी बेरजेचे राजकारण केलेला असेल, याबाबत माझी आणि बापूंची चर्चा झालेली आहे.
पालकमंत्र्यांची चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे. प्रदेशाध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील असं सांगितलं आहे. कार्यकर्त्यांनी आता जे निवेदन दिलेला आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आहे त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री विचार करून निर्णय घेतील असे मला विश्वास आहे असंही भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी आलेल्या निवेदनाबाबत माहिती देताना सांगितलं की यामध्ये कोणत्याही आमदाराचे नाव आलेलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना कोणत्या आमदाराबाबत आहेत किंवा कोणत्या आमदाराला त्यांचा विरोध आहे, त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.








